
नांदेड, 25 मे (हिं.स.) : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या श्रेयवादावरून भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवरील अशासकीय सदस्य नियुक्तीच्या शिफारशीवरून राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे आणि आमदार जितेश अंतापुरकर यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आल्याचे बोलले जात आहे.
आमदार जितेश अंतापुरकर हे विविध विकासकामांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करीत असताना, खासदार अजित गोपछडे हे स्वतंत्रपणे मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हालचाली करून त्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपमधील काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विविध मागण्यांसाठी निवेदने देणे, मंत्र्यांच्या भेटी घेणे आणि त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांतून त्याचा प्रचार होणे यामुळे स्थानिक नेतृत्वात नाराजी वाढल्याचे समजते.
दरम्यान, देगलूर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवरील एका अशासकीय सदस्याच्या शिफारसीमुळे या वादाला अधिक हवा मिळाली आहे. संबंधित सदस्याची शिफारस खासदारांकडून करण्यात आल्याने स्थानिक भाजप गोटात नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे. समितीच्या कार्यपद्धतीनुसार स्थानिक आमदारांना महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे आमदारांना विश्वासात न घेता करण्यात आलेली शिफारस ही त्यांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप मानली जात असल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक असतात. समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांनुसार केली जाते. आमदार, खासदार किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या शिफारशी विचारात घेतल्या जात असल्या तरी अंतिम निर्णय आणि नियुक्ती प्रक्रिया शासन नियमांनुसारच पार पडते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis