
पुणे, 25 मे (हिं.स.)। जनगणना प्रक्रिया सुरू झाली असली तरी कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, त्यामध्ये होत असलेला विलंब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पर्यवेक्षकांची आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधितांना कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या.
स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे झालेल्या बैठकीला सुमारे 1600 पर्यवेक्षक उपस्थित होते. शहरातील विविध भागांत सुमारे 11 हजार प्रगणकांकडून सुरू असलेल्या घरभेटी आणि माहिती संकलनाच्या कामाचा या वेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.प्रत्यक्ष माहिती संकलनाची गती समाधानकारक नसल्याचे समोर आल्यानंतर कामाचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जनगणनेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, माहिती भरताना ॲपचा वापर तसेच प्रक्रियेची उजळणी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.पर्यवेक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगणकांवर नियमित देखरेख ठेवून दररोजच्या कामाचा आढावा घ्यावा, तसेच घरभेटींचे नियोजन प्रभावीपणे पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
जनगणनेचे काम निश्चित कालमर्यादेत आणि अचूकतेने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.या बैठकीस जनगणना संचालनालयाचे सहसंचालक राजेश भोसले उपस्थित होते
. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु