
बीड, 25 मे (हिं.स.)।
तहसीलदार राकेश गिडे यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत त्यांच्या पत्नी नेहा राकेश गिड्डे यांना 'गट-क' संवर्गात अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी 'विशेष बाब' म्हणून अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन पाळले आहे.
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कारला अंबाजोगाई - लातूर महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबीयांची भेट घेऊन नेहा गिड्डे यांना 'गट-क' मधील नोकरी अनुकंपा तत्त्वावर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नेहा गिड्डे यांनी २६ एप्रिल रोजी शासनाकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी केली होती. त्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडून महसूल विभागाला अहवाल सादर करण्यात आला.
शासनाचे आदेश प्राप्त होताच नेहा गिड्डे यांना मिरज तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदावर अनुकंपा योजनेखाली नोकरी देण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने दर्शविण्यात आली होती. परंतु, नागरिकांची जास्त गर्दी असणाऱ्या पदावर नोकरी करण्याची इच्छा नसल्याचे सांगत त्यांनी ही नोकरी नाकारल्याची माहिती नेहा गिड्डे यांनी दिली. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यापैकी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना 'गट-क' मधील पदावर नोकरी मिळणार आहे.
हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून, विशेष बाब म्हणून नेहा गिड्डे यांना सांगली जिल्ह्यात 'गट-क' संवर्गातील पदावर अनुकंपा योजनेखाली नोकरी देण्याचे सूचित केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis