
सोलापूर, 25 मे (हिं.स.)।
ओबीसी समाजाच्या हक्कांचे आणि हिताचे संरक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. देशभरात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी करत “आम्हाला मोजले जात नाही, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी समाज एकवटला तर सरकारला त्याची खरी किंमत कळेल,” असा इशाराही त्यांनी दिला. एका कार्यक्रमानिमित्त लक्ष्मण हाके हे सोलापुरात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे सहा मंत्री असतानाही एकाही मंत्र्याने समाजाच्या अस्तित्वासाठी आणि हितासाठी आवाज उठवला नसल्याची टीका त्यांनी केली.राज्यात ओबीसींची लोकसंख्या 60 टक्के असताना केवळ 0.6 टक्के निधी दिला जात असल्याचा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच मागासवर्गीय समाजात सामाजिक विषमता निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.“कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविले जातात, मात्र सामाजिक दुजाभाव कायम ठेवला जात आहे. महाज्योतीसारख्या महत्त्वाच्या सामाजिक योजनांना पुरेसा निधी दिला जात नाही. सरकारकडून आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड