दिंडोरीत शेतमजुरावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा बिबट्या जेरबंद
दिंडोरी, 25 मे (हिं.स.)। : तालुक्यातील ओझे येथे शेतमजुरावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून परिसरातील शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र अद्यापही बछडे व मादी परिसरात असल्याचा संशय व्यक्त केला
दिंडोरीत शेतमजुरावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा बिबट्या जेरबंद


दिंडोरी, 25 मे (हिं.स.)।

: तालुक्यातील ओझे येथे शेतमजुरावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून परिसरातील शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र अद्यापही बछडे व मादी परिसरात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.१५ मे रोजी बाळू धुळे हे उसाच्या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर तीन वेळा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र हातातील काठीच्या साहाय्याने प्रतिकार करत त्यांनी तेथून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.घटनेनंतर वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावला होता. तब्बल आठ दिवसांच्या प्रयत्नांनंतर प्रविण शिंदे यांच्या उसाच्या शेतात नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बाळू धुळे यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून हा तोच बिबट्या असल्याची खात्री दिली.दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका मेंढपाळावरही बिबट्याने हल्ला केला होता. त्या घटनेनंतर वनविभागाने दुसऱ्या ठिकाणीही पंचनामा करून पिंजरा लावला असून तेथे अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्यात भक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.मात्र जेरबंद झालेल्या बिबट्याची मादी व बछडे अजूनही उसाच्या शेतात असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने मादी व बछड्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी प्रविण शिंदे यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande