
सर्व विभाग प्रमुखांना विशेष खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश
नांदेड, 25 मे (हिं.स.)। आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची' विशेष आढावा बैठक पार पडली.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सविस्तर स्वरूपात संपन्न झाली आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी, तसेच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित व वित्तहानी टाळणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. पावसाळ्यात शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागाने घ्यावी. कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे कडक निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
या बैठकीमध्ये शहरातील रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा, आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेबाबत सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि महानगरपालिका यांनी आपापसात योग्य समन्वय साधून शहरातील रस्ते आणि खोदकामांची अर्धवट असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य आणि अंतर्गत नाल्यांची सफाई युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नाल्यांच्या प्रवाहात असणारे सर्व अडथळे तात्काळ हटवावेत. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वेक्षण करून अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश देण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने २४ तास कार्यरत असणारा मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष तत्पर ठेवण्यात आला आहे. नागरिकांसाठी ०२४६२-२६२६२६ हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis