पेट्रोल पंपांवर ‘कॅश’ची सक्ती ! मनसे आक्रमक
जळगाव, 25 मे (हिं.स.) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास न
पेट्रोल पंपांवर ‘कॅश’ची सक्ती ! मनसे आक्रमक


जळगाव, 25 मे (हिं.स.) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला जात असून, शेतकऱ्यांना कॅन किंवा डब्यांमध्ये डिझेल देण्यास मनाई केली जात आहे. या गंभीर समस्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी मनसेच्या मागण्यांची गंभीर दखल घेत, ऑनलाईन पेमेंट नाकारणाऱ्या पंपांवर तातडीने कारवाई करण्याचे आणि शेतकऱ्यांना इंधन पुरवण्याचे आदेश जारी करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इंडिया’चा नारा देत असताना, जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक मात्र या धोरणाला हरताळ फासत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना ४ ते ५ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, ऐनवेळी पंप चालकांकडून ‘फक्त कॅश’ची अट घातली जाते. यामुळे नागरिकांना एटीएम शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असून, अनेकांना इंधनाशिवाय रिकाम्या हाती परत जावे लागत आहे.मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी या संदर्भात तातडीने कारवाईचे आदेश देणारे पत्र काढण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. या आंदोलनाप्रसंगी मनसेचे ॲड. जमील देशपांडे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande