
सोलापूर, 25 मे (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीकडूनप्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले त्यांचे मजबूत नेटवर्क, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि विविध विकासकामांमुळे प्रशांत परिचारक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका तसेच महानगरपालिका स्तरावर परिचारक समर्थकांची मजबूत फळी असल्याचे मानले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकणारा प्रभावी चेहरा म्हणून महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते त्यांच्याकडे पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय बैठका, पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या चर्चा आणि स्थानिक पातळीवरील हालचालींमुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.
महायुतीतील प्रमुख नेत्यांकडूनही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.आमदारकीच्या काळात प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विविध विकासकामे मार्गी लावली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्य आजही त्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली तरी संघटनात्मक ताकद, आर्थिक नियोजन, मतदारांशी असलेला समन्वय आणि जिल्ह्यातील सध्याची राजकीय समीकरणे लक्षात घेता परिचारक यांचे पारडे जड मानले जात आहे.
महायुतीकडून काही दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.या संभाव्य उमेदवारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनेक सदस्यांनीही परिचारक यांच्या नावाला पसंती दर्शविल्याची चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड