पुणे विधान परिषद जागेवर राष्ट्रवादीचा दावा; ‘ही जागा आमच्या हक्काची’
पुणे, 25 मे (हिं.स.) पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असून पक्षाकडे सर्वाधिक 370 जागांचे संख्याबळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या जाग
पुणे विधान परिषद जागेवर राष्ट्रवादीचा दावा; ‘ही जागा आमच्या हक्काची’


पुणे, 25 मे (हिं.स.) पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असून पक्षाकडे सर्वाधिक 370 जागांचे संख्याबळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या जागेवर दावा करणे योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादीने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. सुनील टिंगरे , महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेवरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह 333 मतांचे संख्याबळ असल्याचा दावा करत ही जागा मागितली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने आपल्याकडे 370 जागांचे संख्याबळ असल्याचा दावा केला. सुनील टिंगरे म्हणाले, “या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता यावेळीही ही जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आग्रही भूमिका मांडली आहे.”ते पुढे म्हणाले की, भाजपने मांडलेले गणित चुकीचे असून या जागेवरून वाद निर्माण करणे योग्य नाही.

“महायुतीमध्ये राष्ट्रवादीने नेहमीच समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, पक्षामध्ये कोणताही अंतर्गत वाद नसून विधान परिषदेसाठी दहापेक्षा अधिक इच्छुक असल्याची माहितीही त्यांनी दिली. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय येत्या मंगळवारी मुंबईत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande