
रत्नागिरी, 25 मे (हिं.स.) । कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ ग्रुपमधील सात जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात खडतर अशी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते केली. या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचा सहभाग होता.
समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहोचून त्यांनी अभिमानाने तिरंगा झेंडा फडकवला, तसेच संविधानाची उद्देशिका प्रदर्शित केली. वयाच्या २१व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असलेला अन्नपूर्णा पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वांत तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मोहिमेसाठी भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी असलेल्या नेपाळ-काठमांडूत सात जणांची टीम १५ मे रोजी दाखल झाली. त्यात रत्नागिरीचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी. के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, मुरूमचे (धाराशिव) उद्योजक अप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर पती-पत्नी नूपुर आणि अक्षय मठकर यांचा समावेश होता.
काठमांडू ते जगातील सर्वांत धोकादायक विमानतळ अशी ओळख असलेल्या लुकला विमानतळावरून छोट्या विमानप्रवासानंतर प्रत्यक्षात एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे वाटचालीला सुरुवात झाली. लुकला-फाकडिंग-नामचे बाजार-तेंगबोचे-दिंगबोचे-लोबुचे-गोरकक्षेप-एव्हरेस्ट बेस कॅम्प असा हा ट्रेक पूर्ण झाला. शनिवारी, २३ मे २०२६ रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या यशस्वी मोहिमेची सांगता झाली.
रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा चार ते सहा अंश सेल्सिअस तापमान असताना लोबुचे ते एव्हरेस्ट बेस कॅम्प या प्रवासात प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी घेत होते. वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जाऊ शकते, हे या ट्रेकवरून या पथकाने अनुभवले. नेपाळमधील ‘पीक १५ अॅडव्हेंचर’चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी