लाल कंधारी गायीने दिला जुळ्या कालवडींना जन्म : परभणीत दुर्मीळ घटना
परभणी, 25 मे (हिं.स.)। महाराष्ट्राच्या, विशेषतः मराठवाड्यातील पारंपरिक पशुधन वारशाचे प्रतीक मानल्या जाणार्या लाल कंधारी या देशी गाईच्या संवर्धन कार्यात एक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अं
लाल कंधारी गायीने दिला जुळ्या कालवडींना जन्म :  परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधन प्रक्षेत्रावरील दुर्मीळ घटना; देशी गोवंश संवर्धनाला नवी प्रेरणा


परभणी, 25 मे (हिं.स.)।

महाराष्ट्राच्या, विशेषतः मराठवाड्यातील पारंपरिक पशुधन वारशाचे प्रतीक मानल्या जाणार्या लाल कंधारी या देशी गाईच्या संवर्धन कार्यात एक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत येणार्या परभणी येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या लाल कंधारी संशोधन व प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर लाल कंधारी गायीने निरोगी जुळ्या मादी कालवडींना जन्म दिला आहे. देशी गोवंश संवर्धन क्षेत्रात ही घटना वैज्ञानिक, आनुवंशिक आणि संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची मानली जात आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षितरीत्या पार पडलेल्या या प्रसूतीनंतर माता गाय आणि दोन्ही कालवडी पूर्णपणे सुखरूप व सक्रिय असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशू प्रजनन तज्ज्ञ डॉ. बी. एल. कुमावत, प्रक्षेत्र संशोधन उपसंचालक डॉ. बी. एस. कातकडे, डॉ. कटकुरी तसेच प्रक्षेत्रावरील कर्मचार्यांनी अत्यंत दक्षतेने प्रसूती व्यवस्थापन केले. गायींमध्ये जुळ्या पिल्लांचा जन्म साधारणतः 1 ते 5 टक्के इतक्याच प्रमाणात आढळतो. देशी जातींमध्ये हे प्रमाण आणखी कमी असल्याने लाल कंधारीसारख्या स्थानिक वंशात जुळ्या मादी कालवडींचा जन्म हा आनुवंशिक आणि संवर्धनात्मक दृष्टीने अभ्यासयोग्य व महत्त्वपूर्ण मानला जात आहे. लाल कंधारी ही महाराष्ट्राची अभिमानास्पद स्थानिक गोवंशीय जात असून उष्ण हवामानातील सहनशक्ती, दुष्काळी परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, कमी संसाधनांमध्ये टिकून राहण्याची ताकद तसेच दुहेरी उपयोगिता यासाठी ती ओळखली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था, पारंपरिक शेती पद्धती आणि शाश्वत पशुपालन व्यवस्थेत या गोवंशाचे महत्त्व विशेष अधोरेखित होते. विशेष म्हणजे, गायींमध्ये जुळ्या पिल्लांचा जन्म हा तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात आढळणारा प्रकार मानला जातो. त्यातही देशी गाईमध्ये जुळ्या मादी कालवडींचा जन्म होणे अधिक दुर्मीळ समजले जाते. मिश्रलिंगी जुळ्या पिल्लांमध्ये ङ्गफ्रीमार्टिनफसारख्या प्रजननविषयक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र या दोन्ही कालवडी मादी असल्याने त्यांची भावी प्रजनन क्षमता सामान्य राहण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो, विविध पशुसंवर्धन संस्था तसेच प्रगत पशुपालकांकडून देशी जनुकसंपदेचे संरक्षण, संवर्धन आणि शास्त्रीय सुधारणा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर परभणीतील ही घटना केवळ जैविक दुर्मीळता नसून देशी गोवंश संवर्धन मोहिमेसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी संकेत मानली जात आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत येणार्या परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या लाल कंधारी संशोधन प्रक्षेत्रावर गोवंश संवर्धन, निवडक पैदास, शास्त्रीय व्यवस्थापन आणि ग्रामीण स्तरावरील जनजागृती यावर सातत्याने काम केले जात असून भविष्यातील शाश्वत पशुधन विकासासाठी हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. हवामान बदल, चार्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी स्थानिक जातींचे संवर्धन आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. दरम्यान, लाल कंधारी गाईच्या या दुर्मीळ जुळ्या मादी वासरांच्या यशस्वी प्रसूतीबद्दल महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन पाटील, शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. स. वा. बोंडे यांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर, डॉ. बी. एल. कुमावत, डॉ. बी. एस. कातकडे, डॉ. कटकुरी आणि प्रक्षेत्रावरील कर्मचार्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande