
नांदेड, 25 मे (हिं.स.)। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर हदगाव तालुक्यात डिझेलचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्य डेपोकडूनच इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हदगाव तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव कॅन किंवा बॉटलमध्ये डिझेल पेट्रोल देण्यास सक्त मनाई केल्याने, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर आणून रांगेत उभे करावे लागत आहेत. डिझेलसाठी तासंतास ताटकळत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन, ड्रम किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इंधन वितरण करण्यास पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई केली आहे. या आदेशामुळे शेतकरी घरून डिझेल नेऊ शकत नसल्याने, त्यांनी थेट आपले ट्रॅक्टरच पंपावर आणले आहेत. परिणामी, हदगाव शहरातील व तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या अभूतपूर्व आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तासंतास रांगेत उभे राहूनही डिझेल संपल्याचे बोर्ड पाहायला मिळत असल्याने संतप्त वाहनधारक आणि शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. डिझेल का मिळत नाही, यावरून पंपावर रोजच वादावादीचे आणि संतापजनक प्रकार घडत आहेत. संतप्त झालेल्या शेतकरी व वाहनधारकांची मनधरणी करता करता पेट्रोल पंप चालकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्यनाकी नऊ येत आहे.
शेतीची मशागत ठप्प मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर जागेवरच उभे असल्याने खरीप पेरणी संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
कृत्रिम टंचाईवर नियंत्रणाची मागणी ही टंचाई नैसर्गिक आहे की काही घटकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पुरवठा सुरळीत करण्याची गरज प्रशासनाने मुख्य डेपोशी संपर्क साधून हदगाव तालुक्यासाठी तातडीने डिझेलचा कोटा उपलब्ध करून द्यावा. डिझेल पेट्रोल मिळत नसल्याने शेतीची कामे कशी करावीत ? प्रशासनाने तात्काळ या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा आणि शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता हदगाव तालुक्यातील पेट्रोल पंप चालक आणि समस्त शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis