नीट पेपरफुटीच्या तणावातून लातूरमधील विद्यार्थिनीचा धक्कादायक शेवट
लातूर, 25 मे (हिं.स.)। देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट-यूजी २०२६ मधील गोंधळामुळे आणि भवितव्याच्या अनिश्चिततेमुळे लाखो निष्पाप विद्यार्थ्यांचे जीवन टांगणीला लागले आहे. अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांव
आत्महत्या


लातूर, 25 मे (हिं.स.)।

देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट-यूजी २०२६ मधील गोंधळामुळे आणि भवितव्याच्या अनिश्चिततेमुळे लाखो निष्पाप विद्यार्थ्यांचे जीवन टांगणीला लागले आहे. अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक आघात झाला असून, याचे अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे परिणाम आता समाजात दिसू लागले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस जिद्दीने अभ्यास करणाऱ्या एका तरुण जिवाचा या व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे नाहक बळी गेला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य अड्डा किंवा केंद्रबिंदू ठरलेल्या लातूर जिल्ह्यातूनच ही हादरवून टाकणारी घटना समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय मैथिली सोनवणे या होतकरू विद्यार्थिनीने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली आहे. शनिवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शेताकडे असलेल्या घराकडे गेली होती. काही वेळाने कुटुंबीयांना ती तिथेच एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. या भयानक दृश्यामुळे हादरलेल्या नातेवाईकांनी तिला तत्काळ खाली उतरवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आत्महत्या म्हणून या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली सोनवणे ही अभ्यासात अतिशय हुशार होती. बारावी विज्ञान शाखेतून तिने ५१.५० टक्के गुण मिळवले होते. तिची मोठी बहीण एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. स्वतःच्या मेहनतीने डॉक्टर होऊन कुटुंबाचे नाव मोठे करण्याचे तिचे सर्वोच्च ध्येय होते. याच जिद्दीने तिने यंदा लातूर शहरातील दयानंद कॉलेज येथून अत्यंत आत्मविश्वासाने नीटची परीक्षा दिली होती, तर पुरणमल लाहोटी कॉलेज येथे तिने एमएच-सीईटीची परीक्षाही दिली होती. तिचा वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर अतिशय उत्तम गेला होता आणि तिला सकारात्मक निकालाची मोठी आशा होती. मात्र, अचानक समोर आलेल्या पेपरफुटीच्या वृत्ताने आणि त्यानंतर परीक्षा रद्द होण्याच्या निर्णयाने ती आतून पूर्णपणे खचून गेली होती. माझा अभ्यास खूप चांगला झाला होता, पेपरही सोपा गेला होता, आता पुढे पुन्हा काय होणार? अशी भीती आणि निराशा ती वारंवार घरच्यांजवळ बोलून दाखवत होती. त्यातच आता पुन्हा २१ जून रोजी होणारी फेरपरीक्षा अधिक कठीण असेल, या सोशल मीडियावरील आणि कोचिंग वर्तुळातील चर्चेने तिच्यावरील मानसिक ताण असह्य पातळीवर नेऊन ठेवला आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

सध्या या राष्ट्रीय स्तरावरील महाघोटाळ्याचा कसून तपास सीबीआय करत असून, आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून ईडी देखील चौकशीच्या तयारीत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या अकरापैकी सात आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. यात लातूरच्या काही नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा तसेच पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर येथील लोकांचाही सहभाग असल्याने राज्यातील शिक्षण क्षेत्राची मोठी बदनामी झाली आहे. या घोटाळ्याचा फटका फक्त महाराष्ट्रालाच बसला नाही, तर राजस्थान मधील सीकर, उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी, दिल्ली तील आदर्श नगर आणि कर्नाटक मधील कलबुर्गी येथेही परीक्षेच्या तणावातून आणि अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर या व्यवस्थेविरुद्ध विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा संताप उफाळून आला असून, शिक्षण व्यवस्थेतील माफिया राज त्वरित संपवण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande