
नांदेड, 25 मे (हिं.स.)। लोहा नगर परिषदेच्या दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली राजकीय ताकद पुन्हा अधोरेखित केली असून, खरेदी-विक्री संघाचे माजी उपसभापती श्याम पाटील पवार आणि माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांचे पुतणे शंकर वट्टमवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.
या बैठकीस मुख्याधिकारी संदीप भोळे सहायक म्हणून उपस्थित होते. नगररचना अभियंता कृष्णा कठारे, अजिंक्य केंद्रे व सुतार यांनी निवड प्रक्रियेस सहकार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलेला शब्द पाळत आर्य वैश्य समाजाला सभागृहात प्रतिनिधित्व देण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनाही योग्य न्याय देण्यात आला आहे. श्याम पाटील पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणुकीच्या काळात उमेदवारी मागे घेत पक्षासाठी एकजूट दाखविली होती. त्या त्यागाची दखल घेत त्यांना स्वीकृत सदस्यपद देण्यात आले असल्याचेही प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले.
निवडीनंतर दोन्ही नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शरद पवार, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
काका-पुतण्यांच्या राजकीय समन्वयाची शहरात चर्चा
लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार हे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे निष्ठावंत सहकारी मानले जातात. स्वीकृत
सदस्यपदासाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती; मात्र त्यांनी स्वतःऐवजी पुतणे शंकर वट्टमवार यांच्या नावाची शिफारस केली. परिणामी २०१३ नंतर वट्टमवार कुटुंबाची नगर परिषद सभागृहात पुनरागमन झाले. तर दुसरीकडे नगराध्यक्ष शरद पवार यांचे धाकटे काका श्याम पाटील पवार यांचीही स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis