
सोलापूर, 25 मे (हिं.स.)।
सिद्धेश्वर तलाव येथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावातील वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा मिसळणारा प्रवाह आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो मासे मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, माशांचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आले. काही मासे ऑक्सिजनअभावी पाण्यावर तडफडताना दिसून आले. मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.दूषित पाण्यामुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. शहरातील सांडपाणी आणि कचरा थेट तलावात सोडला जात असल्याने पाणी अधिक प्रदूषित होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.महापालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत असून तलावाची नियमित स्वच्छता, जलशुद्धीकरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड