
लातूर, 25 मे (हिं.स.)। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापैकी एक आणि रेणुकाई करिअर सेंटरचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने पुण्यातून बेड्या ठोकल्य. सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकरची सध्या कसून चौकशी सुरू असतानाच, त्याचा एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे संताप व्यक्त होत आहे.
व्हिडिओमध्ये, स्वतःला विज्ञानाचा प्राध्यापक म्हणवून घेणारा शिवराज मोटेगावकर चक्क वगार्तील बाकावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात पाने आहेत. तो तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांवर शिंपडताना दिसत आहे. मोटेगावकर पाणी शिंपडण्यावरच थांबला नाही, तर तुम्ही सर्वजण एम्समध्ये प्रवेश मिळवणार आहात, असा योग कित्येक वर्षांनंतर आला आहे, असा दावाही करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभा करणाऱ्या मोटेगावकरची लातूरमध्ये मोठी संपत्ती आहे. तो नामांकित डॉक्टरांच्या मुलांसाठी फोटॉन नावाची एक विशेष बॅच चालवत असे. पालकांनुसार आणि ते किती मोठे डॉक्टर आहेत, यावरून या बॅचचे शुल्क ठरवले जात होते. केमिस्ट्री उत्तम शिकवणारा हा शिक्षक स्वतः मात्र अंधश्रद्धाळू होता, हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis