
परभणी, 31 मे (हिं.स.)संबोधी अकादमी यांच्या वतीने रविवार, दि. 31 मे 2026 रोजी परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी (२५ वा) सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्यात 110 जोडपे विवाहबद्ध झाले. अनेक मान्यवरांच्या आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक नेत्रदिपक सोहळा संपन्न झाला.
प्रमुख अतिथी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर या म्हणाल्या की, डॉ.भीमराव हत्तीअंबीरे यांच्या संकल्पनेतून गेली 25 वर्षांपासून परभणी येथे तसेच 4 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे व त्यांच्या सहकार्याने हिंगोली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. ही अतिशय कौतुकाची बाब आहे. लेक जन्माला आली की वडिलांना चिंता निर्माण होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना आणली आणि संबोधी अकादमीने हजारो जोडप्यांचे विवाह लावून वडिलांची चिंता दूर करण्याचा प्रयन्त केला आहे. सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान रु.50,000 करण्यासाठी मी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेन असेही वचन त्यांनी दिले. यावेळी प्रमुख अतिथी माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, धम्माची शिकवण ठेवून जीवन व्यतीत केली पाहिजे, पंचशीलाचे पालन करा. सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजन करणे हे कार्य अत्यंत निष्ठेने डॉ.भीमराव हत्तीअंबीरे करत असतात त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
यावेळी प्रमुख अतिथी विशेष कार्यकारी अधिकारी नानासाहेब कदम हे म्हणाले की, वधू - वर यांचे आयुष्य आनंदायी आणि सुखी जावे. तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सर्वांचे जीवन सुखी व्हावे असेही ते म्हणाले.प्रमुख अतिथी छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे हे म्हणाले की, संबोधी अकादमीने सामूहिक विवाह सोहळे तसेच अनेक समजोपयोगी कार्य केले आहेत. शिक्षण संस्था, स्पर्धा परीक्षा केंद्र, वृक्षारोपण आदि क्षेत्रात कार्य केले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. राहुजी पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, परभणीचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, महापौर, डॉ.सिद्धार्थ भालेराव, चेअरमन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी पेठशिवणी,सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, चंद्रकांत कांबळे, राजेश वानखडे, बी. एच.सहजराव, अभिजीत पारवे, गणेश राठोड, तारा खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना आयोजक, संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण डॉ.भीमराव हत्तीअंबीरे म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षापासून संबोधी अकादमीच्या माध्यमातून मी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असतो परंतु या विवाह सोहळ्यात कोणाकडूनही एक रुपया वर्गणी गोळा करत नाही. या वर्षीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर व हिंगोली येथेही गेल्या काही वर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे. पुणे छत्रपती संभाजी नगर, नागपूर, हिंगोली , परभणी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे केंद्र संबोधी अकादमीच्या माध्यमातून सुरू आहेत. तसेच त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यातील कन्यादान योजनेच्या अनुदानात वाढ करावी अशीही मागणी केली.सदरील मंगल परिणय विधी पूज्य भदंत हर्षबोधी महाथेरो, प्रमुख, महाबोधी विहार, बुध्दगया, पूज्य भदंत धम्मदिप महाथेरो, अध्यक्ष, भीम जन्मभूमी मेमोरियल सोसायटी, महू पूज्य भदंत पय्याबोधी थेरो, प्रमुख, बुध्द विहार, खुरगाव, नांदेड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी सामूहिक विवाह सोहळा रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त डॉ.सुरेश वाघमारे यांनी संपादित केलेल्या 'संबोधी' या स्मरणीकेचे आणि दै.दिलासा च्या विशेष पुरवणीचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis