
मुंबई, 02 जून (हिं.स.) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असून, सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ही योजना “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” म्हणून लागू करण्यात येणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, एकूण सुमारे 65 लाख कर्जखात्यांवरील सुमारे 36,585 कोटीं रूपयांचा भार या योजनेअंतर्गत माफ केला जाणार आहे. याशिवाय नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला तरी आचारसंहिता संपल्यानंतरच योजनेची अधिकृत अंमलबजावणी व घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार विभागाकडून अटी व शर्तींविषयी परिपत्रक लवकरच जारी केले जाणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी “गुडन्यूज” मिळेल असे संकेत दिले होते. त्यानुसार आजचा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी वर्गात मोठा दिलासा आणि अपेक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी