
अकोला, 02 जून (हिं.स.)। अकोल्यातील हिवरखेड परिसरात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, वीजपुरवठाही वारंवार दीर्घकाळ खंडित झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी वीज तारा तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा बंद झाला असून काही ठिकाणी झाडेही कोसळलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. महावितरणचे अधिकारी कर्मचारी अहोरात्र वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळावर हजर होते.
पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मालठाना खुर्द शेत शिवारातही केळी भुईसपाट
हिवरखेड सह तेल्हारा तालुक्यातील आणि परिसरातील सर्वच गावांना अवकाळी वादळाचा तडाखा बसला असून बागायती आणि फळबाग धारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळाचे पडसाद मालठाणा खुर्द शेत शिवारातही पहायला मिळाले. गोपाल रामराव हागे, सुनील गोविंदा दुधे, सूर्यभान शामराव हागे यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा भुई सपाट झाल्या आहेत. त्यामुळे हिवरखेड सह तेल्हारा तालुक्यातील सर्वच बागायती शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करणे अत्यावश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे