
परभणी, 31 मे (हिं.स.)।
कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना रस्त्यावरील रायखेडा पाटीजवळ रविवार (दि.३१) सकाळी ०७:३० च्या सुमारास घडली. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सेनगाव तालुक्यातील दताड येथील अनिल देवीदास सुर्वे (वय २५) व संकेत दत्ता बेले (वय २५, रा. पुसद) हे दोघे दुचाकीवरून जिंतूरमार्गे संभाजीनगरकडे निघाले होते. अनिल सुर्वे यांचा भाऊ मागील दीड महिन्यांपासून संभाजीनगर येथील रुग्णालयात कोमात असून त्याच्या उपचारासाठी लागणारे पैसे घेऊन हे मोटारसायकलवर निघाले होते.
रायखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या या दुचाकीला जोराची धडक दिली. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अजीज यांनी तपासणी करून अनिल सुर्वे यांना मृत घोषित केले. तर संकेत बेले यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले.दरम्यान अनिल सुर्वे यांच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे.. सुर्वे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि मुजाजी दळवे, पोहेका उध्दव माने व हरिभाऊ गायकवाड यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट दिली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis