
छत्रपती संभाजीनगर, 31 मे (हिं.स.)। ज्या संस्थेने आपल्यास मानसन्मान, नावलौकिक मिळवून दिला, त्या संस्थेशी शिक्षक, कर्मचा-यांनी ऋणानूबंध जपला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मे अखेरीस निवृत्त होणा-या शिक्षक, कर्मचा-यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, प्रभारी कुलसचिव डॉ.गणेश मंझा यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.महेंद्र शिरसाठ, परकीय भाषा विभागातील कक्ष अधिकारी मीर मुश्ताक अली, प्राणीशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर व्ही.आर.जाधव तसेच रसायनशास्त्र विभागातील प्रमुख पहारेकरी बिसमिल्ला खान यांचा निवृत्तीनिमित्त स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी शिक्षक, कर्मचा-यांनी मनोगत व्यक्त केले. कक्षधिकारी मीर मुश्ताक अली म्हणाले, विद्यापीठाने मला नोकरीत सन्माना सोबतच प्रेम ही दिले. तर कर्मचा-यांचे प्रश्न मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी ’पेन्शन सेल’ सुरु केल्यापासून गतीने मार्गी लागत आहेत, असे विजय जाधव म्हणाले. गेल्या २३ वर्षात सर्व कुलगुरुंचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे डॉ.महेंद्र शिरसाठ म्हणाले. विशेषतः कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या सोबत जवळून प्रशासनात काम करता आल्याचा मनस्वी आनंद आहे, असेही डॉ.शिरसाठ म्हणाले. तर डॉ.महेंद्र शिरसाठ यांनी पदार्थविज्ञान सोबतच इलेक्ट्रॉनिक्स विभाग, डीडीयुकेके तसेच विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून उत्तम काम केल्याचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले.
कार्यक्रमास सर्व अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.महेंद्र शिरसाठ यांनी गेल्या २३ वर्षात तब्बल २० कोटीचा निधी खेचून आणला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थाकडून प्राप्त निधी संशोधन प्रकल्प राबविण्यात आले.पदार्थविज्ञान विभागातील अध्यापक, संशोधक असलेले डॉ.शिरसाठ इलेक्ट्रॉनिक्स व दिनदयाल उपाध्यास कौशल्य केंद्राचे संस्थापक विभागप्रमुख ही आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील ३८ वर्षांच्या अध्ययन, संशोधन सेवेनंतर ३० मे रोजी निरोप देण्यात आला.
या निमित्ताने डॉ.शिरसाठ यांच्या कारकिर्दितील महत्वपूर्ण घटना-
- डॉ.महेंद्र शिरसाठ हे ऑगस्ट २००३ पासून विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागात कार्यरत आहेत.
- या काळात एकुण २८ संशोधन प्रकल्प राबविण्यात आले. यामध्ये केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सीएसआयआर, विद्यापीठ अनुदान आयोग, आयक्युएसी, इंटर युनिर्व्हसिटी अॅक्सलेटर सेंटर, डीएसटी-इन्स्पायर या संस्थाकडून निधी प्राप्त झाला. तसेच पायाभूत सुविधा संदर्भात देखील सात संशोधन प्रकल्प राबविण्यात आले. यामध्ये रुसा सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडीज, डीएसटी-फिस्ट, डीडीयुकेके, इन्क्यूबूशन सेंटर, कम्युनिटी कॉलेज, युजीसी सॅप या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच अमेरिकेतील ’नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ हेल्थ सायन्सेस’ यांनी २ लाख ४० हजार डॉलर्सचा निधी ’बेरेबल नॅनोसेन्सर अॅटी फॉर रिअल टाइम मॅनिटरींग ऑफ डिझेल अॅण्ड गॅसोलाईट एक्झाहस्ट’ हा प्रकल्प राबविण्यात आला. याशिवाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, कुलसचिव, विभागप्रमुख, अकॅडमिक स्टाफ कॉलेज चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis