
रत्नागिरी, 31 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात येत्या चार दिवसांत तुरळक पावसाची शक्यता असली, तरी पण मोसमी पाऊस येत्या १० जूनपर्यंत राज्यात येणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने येत्या ४ दिवसांचा हवामानाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार येत्या चार दिवसांत दुपारी, संध्याकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळ, मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहणार आहेत.
असे असले, तरी किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मोसमी पावसाच्या आगमनाची शक्यता नाही. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपारनंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणातदेखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मोसमी पावसाशी काहीही संबंध नाही. कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.
कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी