
अमरावती, 01 जून (हिं.स.)
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान, अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. सुमारे एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.काही ठिकाणी वाहतूकही मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, या पावसामुळे वाढत्या तापमानाला आळा बसून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काही दिवसांतही हवामानात बदल कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी