सोलापूर : सत्ताधारी आमदारांशी संबंधित कारखान्यांकडे सर्वाधिक ऊसबिलांची थकबाकी
सोलापूर, 01 जून (हिं.स.)।सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संबंधित साखर कारखान्यांकडे तब्बल २१८ कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदारांशी संबंधित कारखान्यांकडेच सर्वाधिक थकबाकी अ
sugar mill


सोलापूर, 01 जून (हिं.स.)।सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संबंधित साखर कारखान्यांकडे तब्बल २१८ कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदारांशी संबंधित कारखान्यांकडेच सर्वाधिक थकबाकी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे ३०.४४ कोटी रुपये, मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे ३०.२२ कोटी रुपये, तर उमरगा तालुक्यातील विठ्ठलसाई साखर कारखान्याकडे २०.७७ कोटी रुपयांची ऊसबिले प्रलंबित आहेत.

एकूण थकबाकीपैकी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटी रुपये, तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे ९० कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून थकीत रकमेच्या वसुलीसाठी मागणी जोर धरत आहे.

संत कुर्मदास साखर कारखाना माजी आमदार धनाजी साठे यांच्या ताब्यात आहे. भीमा सहकारी साखर कारखाना धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित मानला जातो, तर कमलाभवानी शुगर हा कारखाना माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहे.

मुरूम येथील विठ्ठलसाई साखर कारखाना माजी आमदार बसवराज पाटील यांच्याशी संबंधित असून, माजी मंत्री तानाजी सावंत तसेच आमदार अभिजित पाटील यांच्याशी संबंधित कारखान्यांकडेही ऊसबिलांची मोठी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या रकमांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने संबंधित कारखान्यांवर दबाव वाढत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande