

रत्नागिरी, 1 जून (हिं.स.) । रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ६ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी ३० मे रोजी पहिला अर्ज दाखल केला. आज सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) १, मानसी संतोष म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ आणि अनिकेत सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) ४ अशा ५ उमेदवारांची आजच्या दिवशी ११ असे एकूण ६ उमेदवारांचे एकूण १२ अर्ज दाखल झाले.
निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे दाखल केला. यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, मिहिर माने, सौ. माधवी माने उपस्थित होते. महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनीही आपला उमदेवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री नीतेश राणे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी