

रायगड, 01 जून (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारांनी १२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
३० मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी पाच उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.
यामध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, मानसी संतोष म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ तसेच अनिकेत सुनील तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी ४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
अशा प्रकारे एकूण ६ उमेदवारांकडून १२ नामनिर्देशनपत्रे निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली आहेत. दाखल अर्जांची छाननी मंगळवार, २ जून रोजी करण्यात येणार असून त्यानंतर वैध उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून आगामी दिवसांत निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)