
सोलापूर, 01 जून (हिं.स.)।
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे गेल्या महिनाभरापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग सुट्ट्या, अधिक मास आणि विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर देशभरातून स्वामी भक्त अक्कलकोटकडे आकर्षित होत आहेत. परिणामी, मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्थेवर ताण निर्माण होत असून सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि परदेशातूनही हजारो भाविक दररोज अक्कलकोटमध्ये दाखल होत आहेत. विशेषतः सुट्टीच्या कालावधीत मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असल्याने अनेकांना दर्शनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. काही वेळा गर्दीचे प्रमाण वाढल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता भाविकांनी व्यक्त केली आहे.
सध्या अक्कलकोट नगरपरिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामे सुरू असली, तरी मंदिर आणि समाधी मठ परिसरातील मर्यादित जागेमुळे दर्शन व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुविधा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
भाविकांच्या मते, साईबाबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि गजानन महाराज मंदिर यांच्या धर्तीवर आधुनिक आणि नियोजनबद्ध दर्शन व्यवस्था अक्कलकोटमध्येही विकसित करण्यात यावी. यामध्ये स्वतंत्र दर्शन रांगा, मार्गदर्शन केंद्रे, प्रशस्त प्रतीक्षागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि अन्य मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
याशिवाय, भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करणारे प्रशिक्षित सेवेकरी व कर्मचारी नियुक्त करणे, पोलीस प्रशासनाशी अधिक समन्वय साधणे आणि गर्दी व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेणे आवश्यक असल्याचे मत पुढे येत आहे. विशेषतः दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भाविकांसाठी स्वतंत्र व सुलभ दर्शन व्यवस्था उभारण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित, सुसूत्र आणि भक्ताभिमुख दर्शन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मंदिर समितीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्वामी भक्तांकडून होत आहे. अक्कलकोट हे देशभरातील स्वामी भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड