
अकोला, १ जून (हिं.स.) : शहरातील जन्म–मृत्यू विभागाशी संबंधित सीआरएस पोर्टल मागील ७ ते ८ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखले मिळविण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या.
तक्रारींची दखल घेत सभापती अग्रवाल यांनी भरतीया रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जवळपास १०० ते १५० नागरिक जन्म–मृत्यू दाखले मिळविण्यासाठी रांगेत प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
पाहणीदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचे तसेच नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णालय परिसरात दगड-विटांचे तुकडे पसरलेले असल्याने नागरिकांना चालण्यातही अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रारही करण्यात आली.
तसेच कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य माहिती दिली जात नसल्याचा आरोपही उपस्थित नागरिकांनी केला. विवाह नोंदणी कार्यालयात दररोज ३० ते ३५ नोंदी होत असून, येथेही वर–वधू व नातेवाईकांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले.
याशिवाय दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याचेही निदर्शनास आले.
या पाहणीनंतर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसरात पेवर्स ब्लॉक बसविणे, बसण्याची सुविधा, कर्मचाऱ्यांची व्यवस्थित बैठक व्यवस्था आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
या वेळी नगरसेवक सिद्धार्थ उपरवट, नितीन ताकवाले, विनोद मापारी, मनपा उपायुक्त विजय पारतवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी रुची पहूरकर तसेच माजी नगरसेवक तुषार भिरड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे