
अकोला, १ जून (हिं.स.) : शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता कायम आहे.
रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून घरे उभारण्यात आली होती. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून २०१६ पासून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येत होत्या. सुमारे १६० घरांना यापूर्वी नोटीस देण्यात आली होती.
प्रशासनाने अतिक्रमणधारकांना ३१ मे ही अंतिम मुदत दिली होती. तसेच सकाळी ९ वाजेपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर आज सकाळपासून रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली.
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दल, पोलीस दल आणि महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारवाईला वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शविला आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनासोबत चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये अतिक्रमण हटविण्यापूर्वी बाधित नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या शासन निर्णयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे