आधार नोंदणीच्या मदतीने मूकबधीर बालकाची कुटुंबाशी यशस्वी भेट; १४ वर्षांनी पुनर्मिलन
अकोला, १ जून: अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आधार नोंदणीच्या माध्यमातून एका मूकबधीर १४ वर्षीय बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत आज त्या बालकाला त्याच्या कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले.
आधार नोंदणीच्या मदतीने मूकबधीर बालकाची कुटुंबाशी यशस्वी भेट; १४ वर्षांनी पुनर्मिलन


अकोला, १ जून: अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आधार नोंदणीच्या माध्यमातून एका मूकबधीर १४ वर्षीय बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत आज त्या बालकाला त्याच्या कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंब आणि बालकाच्या पुनर्मिलनाने भावनिक वातावरण निर्माण झाले.

ही घटना ८ एप्रिल रोजी घडली होती. लोहमार्ग चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांना अकोला रेल्वे स्थानकावर एक मूकबधीर बालक एकटेच भटकत असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.

बालक मूकबधीर असल्याने त्याच्याशी संवाद साधून पत्ता शोधणे कठीण झाले होते. यासाठी शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली, मात्र यश मिळाले नाही. त्यानंतर आधार क्रमांकाच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आली.

या प्रक्रियेत बाल कल्याण समितीचे सुनील लाडुलकर यांनी आधार नोंदणीसाठी प्रयत्न केले. पुढे तांत्रिक मदतीसाठी महाआयटीचे प्रमोद ठाकूर यांनी सहकार्य केले. तसेच मुंबईतील आधार कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती मिळवण्यात आली.

तांत्रिक प्रक्रियेनंतर बालकाच्या आधार डेटामधून मोबाईल क्रमांक प्राप्त झाला. हा क्रमांक मध्यप्रदेशातील खांडवा येथील असल्याचे स्पष्ट झाले. संपर्क साधल्यानंतर मुलाच्या वडिलांनी फोन उचलला आणि मुलगा सुरक्षित असल्याचे समजताच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओ कॉलद्वारे मुलगा आणि कुटुंबीयांमध्ये भावनिक संवादही झाला.

यानंतर १ जून रोजी बालकाचे आई-वडील आणि काका खांडवा येथून अकोला येथे आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालकाला बालगृहातून मुक्त करण्यात आले आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते त्याला कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले.

या प्रक्रियेत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, शासकीय बालगृह अधीक्षक जयश्री हिवराळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या यशस्वी प्रयत्नांमुळे तंत्रज्ञान आणि समन्वयाच्या मदतीने हरवलेल्या बालकाला कुटुंबाशी पुन्हा जोडणे शक्य झाल्याचे प्रशासकीय पातळीवर कौतुक करण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande