
अकोला, १ जून (हिं.स.) : शहरात सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून आले. जोरदार वाऱ्यांनी हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
हवामान विभागाने यापूर्वीच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अकोला शहर आणि परिसरात जोरदार वारे वाहू लागल्याने दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला.
वाऱ्यांच्या वेगामुळे रस्त्यावरील धूळ, कचरा आणि हलक्या वस्तू हवेत उडू लागल्या. त्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी वाऱ्यांचा वेग लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता असून काही भागांत पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही प्रशासनाने सूचित केले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे