
जळगाव, 01 जून (हिं.स.)विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून सुरुवातीला अनेक नावे पुढे आली मात्र पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र अवलंबित श्री. महाजन यांनी उमेदवारी बहाल केली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना आहे. सारख्या माणसावर विश्वास दर्शवित भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिले की पक्ष दखल घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी देत न्याय देतो हे यावरून स्पष्ट आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत जळगावचे नंदकिशोर महाजन यांचे नाव समोर येताच राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि चर्चांना उधाण आलेे. उमेदवारीसाठी अनेक प्रस्थापित आणि प्रभावशाली नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचा वापर करत महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाकडे केवळ राजकीय नियुक्ती म्हणून नव्हे, तर तब्बल दोन दशकांच्या पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक कार्याची मिळालेली पावती म्हणून पाहिले जात आहे. भाजपमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम करताना नंदकिशोर महाजन यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे, निवडणुकांमध्ये संघटनात्मक कामाला प्राधान्य देणे आणि पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहणे, ही त्यांची ओळख राहिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर