
बीड, 01 जून (हिं.स.) : पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्या प्रकारांवर बीड ग्रामीण पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारी खोट्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात संबंधितांविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणाची सुरुवात मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध केलेल्या तक्रारीने झाली होती. त्यानंतर बेलवाडी येथील समाधान बाबुराव खिंडकर यांनीही प्रत्युत्तरादाखल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा आरोप करत दुसरी तक्रार नोंदवली होती.
दोन्ही तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तांत्रिक व प्रत्यक्ष तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज (सीसीटीव्ही) तपासण्यात आले असून ३० मे रोजी रात्री १०.०५ ते १२ या वेळेत कथित घटना घडल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
याशिवाय साक्षीदारांचे जबाब नोंदवून ते ‘ई-साक्ष’ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. उपलब्ध पुराव्यांवरून दोन्ही पक्षांनी जाणूनबुजून पोलिसांची दिशाभूल करून खोट्या तक्रारी दाखल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे न्याययंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनी वैयक्तिक वादांमध्ये खोट्या तक्रारी देण्यापासून दूर राहावे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis