अमरावती विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठी फूट; विप्लव बाजोरिया यांची अपक्ष उमेदवारी
अमरावती, 01 जून (हिं.स.)। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे सुपुत्र, माजी आमदार विप्लव बा
अमरावती विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठी फूट; विप्लव बाजोरिया यांची अपक्ष उमेदवारी


अमरावती, 01 जून (हिं.स.)।

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे सुपुत्र, माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी पक्षाच्या भूमिकेला छेद देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून निवडणुकीतील समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीकडून अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतरही विप्लव बाजोरिया यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना शिंदे गटातील नाराजी उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बाजोरिया कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

विप्लव बाजोरिया यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर नवे आव्हान निर्माण झाले असून मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अमरावतीतील विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील नेते या बंडखोरीवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande