
घटनेमुळे स्थानिकांना घातपाताचा संशय
लातूर, 01 जून (हिं.स.)। सायकल घेऊन खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका ७ वर्षीय बालकाचा २४ तासांनंतर तलावात मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. दानियाल युसुफ पटेल असे या बालकाचे नाव असून, पटेल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे औसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा येथील हाश्मी चौक परिसरात राहणारे युसुफ रियाजोद्दीन पटेल यांचा दानियाल हा लहान मुलगा असून, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आपली सायकल घेऊन खेळण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोधा घेतला. नातेवाईक, मित्र आणि परिसरातील विहिरींमध्ये शोध घेऊनही त्याचा कुठेच सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांच्या मदतीने श्वानपथकाद्वारेही माग काढण्याचा प्रयत्न करण्यात
आला. मात्र, यश आले नाही.
शनिवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास सारोळा शिवारातील लघू प्रकल्पाच्या (तलाव) पाण्यात एक मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आला. हा मृतदेह बेपत्ता दानियालचाच असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे, दानियालचे घर आणि हा तलाव यामध्ये जवळपास ३ किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आहे. दानियालची सायकल औसा-सारोळा रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली. तर त्याचा मृतदेह तलावात आढळला. एका बालकाने एवढ्या लांब जाणे आणि त्याचा तलावात मृतदेह मिळणे, यामुळे स्थानिक जनतेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
मयत बालकाच्या अंगावर कुठेही जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत नाही. कारण मृतदेहावर संशयास्पद असे काहीही दिसून आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis