राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी साहित्य प्रतिभेचा गौरव
चांदवड, १ जून (हिं.स.) : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ’ आणि ‘सार्वजनिक वाचनालय, चांदवड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मराठ
Chandwadi Rupayya' award


चांदवड, १ जून (हिं.स.) : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ’ आणि ‘सार्वजनिक वाचनालय, चांदवड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीचा गौरव करणारा हा सोहळा शब्दांचा उत्सव आणि प्रतिभेचा सुवर्णसंगम ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात सायली आचार्य यांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. त्यानंतर मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र देवरे यांनी संस्थेच्या दशकपूर्ती प्रवासाचा आणि साहित्यिक कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी राजू देसले यांनी ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीचे कौतुक करत, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. तर दुसरे प्रमुख पाहुणे चंद्रकांत संकलेचा यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींमधील अस्सल शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र मलोसे यांनी लेखकांनी समाजाला दिशा देणारे आणि मूल्याधिष्ठित लेखन करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रतिष्ठेचा ‘चांदवडी रुपय्या युवा पुरस्कार’ अविनाश पोइनकर (चंद्रपूर) आणि अनिकेत मयेकर (रत्नागिरी) यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘काव्य पुरस्कार’ चंद्रकांत बाबर, ‘साहित्य प्रेरणा पुरस्कार’ राजेंद्र दिघे आणि ‘लक्षवेधी पुरस्कार’ फणींद्र मंडलिक यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मान्यवरांनी आपल्या साहित्यनिर्मितीचा प्रवास, प्रेरणा आणि संघर्ष याविषयी मनोगते व्यक्त केली. यानंतर संदीप देशपांडे, जनार्दन देवरे आणि सागर जाधव जोपुळकर यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींवर अभ्यासपूर्ण भाष्य केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माया ठोके, संदीप गुजराथी, सविता दरेकर, ऋषिकेश दायमा, अक्षरा देवरे आणि दिगंबर देवढे यांनी मनोगते व्यक्त केली. या सोहळ्याला साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी केले, तर निमंत्रक व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande