
रायगड, 01 जून (हिं.स.) : क्राईस्ट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) पुणे-लवासा कॅम्पसमध्ये मे २०२६ महिन्यात शैक्षणिक, संशोधन, तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि नवोपक्रम यांचा संगम घडवून आणणारे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध विभागांनी कार्यशाळा, परिषद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले.
इंग्रजी आणि सांस्कृतिक अध्ययन विभागाने ‘भाषादान ७.०’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या भाषिक वारशाबाबत जागरूकता निर्माण केली. तर विधी विभागाने ‘नज थिअरी’ या विषयावरील कार्यशाळेत निर्णयप्रक्रियेतील मानसशास्त्रीय घटकांचा उहापोह केला.
वाणिज्य, वित्त आणि लेखाशास्त्र विभागात ‘जनरेशन झेड कार्यसंस्कृती आणि स्टार्टअप्स’ या विषयावरील जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. तसेच उद्योजकता बूटकॅम्प आणि पिच डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक-आर्थिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.
एमबीए विभागाच्या पुढाकाराने ‘इंडिया इनोव्हेशन फोरम’चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्रामीण भागातील प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान विभागात रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग या विषयांवरील तज्ज्ञ सत्रांमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाली.
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कृती-आधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापन यावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय, ‘TEDxChristULavasa 2026’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भारताच्या परंपरा, नवोपक्रम आणि जागतिक भूमिकेवर विचारमंथन केले.
सामाजिक उत्तरदायित्व जपत सेंटर फॉर सोशल ॲक्शनतर्फे ‘स्प्रिंग ओरा समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हस्तलिखित निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी पोलंड येथे शैक्षणिक अध्ययन दौरा आयोजित करण्यात आला. तर क्राईस्ट इन्फोटेकने विविध प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे डिजिटल कौशल्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला.
दरम्यान, जून महिन्यात इंग्रजी आणि सांस्कृतिक अध्ययन विभागात ‘२१व्या शतकातील मानवविद्या अध्यापनासाठी पर्यायी अध्यापन पद्धती’ या विषयावरील विशेष प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह संशोधन, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत क्राईस्ट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) पुणे-लवासा कॅम्पस ‘हब ऑफ अॅनालिटिक्स’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)