
अमरावती, 01 जून (हिं.स.)
अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी शहरातील विविध दवाखाने व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात आयसोलेशन दवाखाना, महानगरपालिका शाळा जेवड, महानगरपालिका शाळा बडनेरा तसेच मोदी हॉस्पिटलचा समावेश होता.
पाहणी दौऱ्याची सुरुवात आयसोलेशन दवाखान्यापासून करण्यात आली. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी रुग्णांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा, उपचार व्यवस्था, औषधसाठा, मनुष्यबळाची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णसेवेची गुणवत्ता यांची सखोल तपासणी केली. दवाखान्यातील विविध विभागांना भेट देऊन त्यांनी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या. रुग्णांना वेळेत, दर्जेदार व परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक जबाबदारीने कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दवाखाना परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
याच परिसरातील महानगरपालिका शाळेचीही त्यांनी पाहणी केली. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने बांधकाम विभागाने तातडीने नियोजन करून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्यानंतर आयुक्त वर्षा लड्डा यांनी महानगरपालिका शाळा जेवड येथे भेट देऊन शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरू असलेल्या शाळेच्या बांधकामाची तपासणी करताना कामाची गुणवत्ता, दर्जा व वेळेत पूर्णत्व यावर विशेष भर देण्यात आला. सदर शाळा भविष्यात अमरावती जिल्ह्यातील आदर्श व उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर महानगरपालिका शाळा बडनेरा येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापन पद्धती, मूलभूत सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच शैक्षणिक गुणवत्ता यांचा आढावा घेण्यात आला. शाळेतील वाढती पटसंख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बांधकाम विभागाने अतिरिक्त वर्गखोल्यांच्या निर्मितीबाबत नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
पाहणी दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आयुक्त वर्षा लड्डा यांनी मोदी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णसेवा, वैद्यकीय उपकरणे, आपत्कालीन सेवा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या मोदी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य व शिक्षण या मूलभूत सेवांच्या गुणवत्तेमध्ये सातत्याने सुधारणा करणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष पाहणी, नियमित आढावा आणि आवश्यक त्या सुधारणा यांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी