
औद्योगिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सिन्नर, 01 जून (हिं.स.)।
माळेगाव औद्योगिक वसाहतीतून नाल्यांद्वारे येणारे दूषित पाणी सरदवाडी धरणात मिसळत असून, त्यामुळे 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरच संकट ओढावले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.लोणारवाडी, जामगाव, पास्ते, सरदवाडी आणि भाटवाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजना सरदवाडी धरणावर अवलंबून आहेत. सध्या धरणात मृत साठा शिल्लक असतानाच माळेगाव बंधार्यात जमा होणारे सांडपाणी व औद्योगिक दूषित पाणी नाल्यांमार्फत धरणात पोहोचत आहे. बहुतेक कंपन्यांनी अंडरग्राउंड पाइप टाकून त्यातून हे पाणी माळेगाव परिसरातील नाल्यात सोडले आहे. तेच पाणी थेट सरदवाडी धरणात पोहोचत असल्याने धरणातील शिल्लक पाणीसाठा प्रदूषित होत असून, परिसरातील विहिरींनाही केमिकलयुक्त पाणी उतरले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पाच गावांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माळेगाव ग्रामपंचायत यांना तातडीने पत्र पाठवून दूषित पाण्याला अटकाव घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
आंदोलनाचा इशारा
सरदवाडी धरणावर अवलंबून असलेल्या पाच गावांतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दूषित पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करून जबाबदारांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाटवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज महात्मे, लोणारवाडीचे सरपंच डॉ. सदाशिव लोणारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV