
जळगाव , 01 जून (हिं.स.) धरणगावसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून पश्चिम रेल्वे प्रशासनाने ०६१८१/०६१८२ कोयंबतूर–जयपूर विशेष एक्स्प्रेस या गाडीला धरणगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राजस्थान आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे धरणगाव तालुक्यातील व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच राजस्थानशी व्यावसायिक संबंध असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर रेल्वेने प्रवास करतात. मात्र, या गाडीचा धरणगाव येथे थांबा नसल्याने प्रवाशांना जळगाव किंवा इतर स्थानकांवरून गाडी पकडावी लागत होती. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता.
या प्रश्नासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला. पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य महेंद्र कोठारी यांनी यासंदर्भात खासदार स्मिता वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यानंतर खासदार वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रवाशांच्या अडचणी मांडल्या. प्रवाशांची वाढती संख्या, धरणगावचे भौगोलिक महत्त्व आणि परिसरातील व्यापारी गरजा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत अखेर या गाडीला थांबा मंजूर केला. या निर्णयामुळे धरणगावसह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.राजस्थानातील जयपूर, कोटा, अजमेर तसेच दक्षिण भारतातील विविध शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा थांबा विशेष लाभदायक ठरणार आहे. व्यापार, शिक्षण, धार्मिक पर्यटन आणि नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, धरणगाव रेल्वे स्थानकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता भविष्यात आणखी लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या निर्णयाबद्दल प्रवासी संघटना, व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासन, खासदार स्मिता वाघ आणि महेंद्र कोठारी यांचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर