
अमरावती, 01 जून (हिं.स.)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती आगार क्रमांक १ येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुरक्षित आणि अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला आमदार संजय खोडके,आ.सुलभा खोडके ,शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती बंड, अमरावती महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर आगार व्यवस्थापक भाकरे मॅडम तसेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव मोहित देशमुख, विभागीय अध्यक्ष नंदकिशोर नवाथे, संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मागील एक वर्षभर अपघातमुक्त आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या राज्य परिवहन चालकांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सलग २५ वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा त्यांच्या पत्नींसह विशेष सत्कार करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला. मान्यवरांनी चालक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमात एसटीच्या सेवाभावी परंपरेचा गौरव करण्यात आला तसेच भविष्यातही सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवाशाभिमुख सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी एसटीच्या विकासासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेतर्फे उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी