नाशकात रिंगरोड व एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा संताप
विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी नाशिक, 01 जून (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील रिंगरोड व एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे प्रकल्पग्रस्त श
Farmers' anger against


विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नाशिक, 01 जून (हिं.स.)।

नाशिक जिल्ह्यातील रिंगरोड व एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, शेतकरी नेते अँड, कैलास खांडबहाले, विनोद नाठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले . या निवेदनात जिल्हा प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेच्या मदतीने बेकायदेशीरपणे व बळजबरीने भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भूसंपादनाविरोधात आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. काही ठिकाणी मोबदला न देता कामे सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच अधिकाऱ्यांकडून व ठेकेदारांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांकडून मूळ प्रश्नांना बगल देत दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन शेतकऱ्यांशी अन्यायकारक वर्तन करत असल्याचेही म्हटले आहे. शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सदर भूसंपादन प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची, पोलीस बळाचा वापर थांबविण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यपालांकडे तक्रार करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी १७ गावातील बाधिक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते .

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande