
लातूर, 01 जून (हिं.स.)।
लातूर शहरातील औसा रोडवरील दत्त मंदीरच्या शेजारी सार्वजनीक रस्त्यावर असलेल्या झाडालाच वीज मीटर डकवल्याचे निदर्शनास आले. हे अतिक्रमण समजून लातूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ताकीद देताच वीज मंडळाने ते तात्काळ काढून घेतले.
लातूर शहरातील दत्त मंदीर परिसरातील एका व्यावसायीकाने रस्त्यावरील झाडालाच वीज मीटरसाठी खिळे ठोकून डकविले होते. त्यातूनच वीज पुरवठा घेवून तो गेल्या अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करीत होता. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख गोपी साठे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी
वीज मंडळाचे कर्मचारी व त्या व्यावसायीकाला बोलावून घेत झाडावर लावण्यात आलेल्या वीज मीटरचे अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी ताकीद दिली. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तर अशा पद्धतीने झाडावर वीज जुळवणी कशी काय दिली असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. झाडाला खिळा मारण्यास देखील परवानगी नसताना एक नागरीक अनेक
वर्षापासून आपल्या दुकानात, घरात, भिंतीवर वीज मीटर न लावता महापालिकेच्या रस्त्यावरील सार्वजनीक ठिकाणी झाडाला वीज मीटर लावल्या प्रकरणाची शहरामध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे. लातूर महापालिका अतिक्र मण विभागाचा पद्भार घेताच या पथकाचे प्रमुख गोपी साठे यांनी अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. त्यांनी
आज पहिल्यांदा लातूरच्या औसा रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अतिक्र मण धारकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व त्यांना तात्काळ हे अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. आज गुलाबपुष्प देऊन स्वागत केले उद्या अतिक्रमण करण्यात आलेले सर्व साहित्य उचलून नेण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis