लातूर विमानतळ विकासासाठी ५६ कोटींच्या निधीस मंजुरी; प्रकल्पाला मिळणार गती
लातूर, १ जून (हिं.स.) : जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ५६ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. तसेच विमानतळाच्या परिचालनासाठी प्रतिवर्ष ३७ लाख ७८ हजार रुपयांचा
लातूर विमानतळ


लातूर, १ जून (हिं.स.) : जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ५६ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. तसेच विमानतळाच्या परिचालनासाठी प्रतिवर्ष ३७ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विमानतळ कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून लातूर विमानतळाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या मुद्द्यावर विधिमंडळातही आवाज उठविण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर शासनाने हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर केला आहे.

मंजूर निधीतून विमानतळावर रनवे एंड सेफ्टी एरिया (RESA) विकसित करण्यात येणार आहे. तसेच ३.३८ किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारली जाणार असून ४.५ मीटर रुंदीचा आणि सुमारे ८ किलोमीटर लांबीचा परिघीय रस्ता तयार केला जाणार आहे. रनवे सुधारणा कामांसह नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

याशिवाय अग्निशमन केंद्र, आपत्कालीन सेवा केंद्र, अँटी-हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आणि विमानतळ सुरक्षिततेसाठी आवश्यक अन्य सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या कामांमुळे विमानतळाचे आधुनिकीकरण होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे.

लातूर विमानतळ विकासासंदर्भात एप्रिल २०२५ मध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. तसेच मार्च २०२६ च्या राज्य अर्थसंकल्पात रात्रीच्या उड्डाणांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

लातूर विमानतळाच्या विकासामुळे मराठवाड्यातील हवाई संपर्क अधिक सक्षम होणार असून उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवीन संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande