गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग
शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ नंदुरबार, 01 जून (हिं.स.) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादनवाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत
गाळमुक्त धरण,


शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ

नंदुरबार, 01 जून (हिं.स.) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय

वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादनवाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत

आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे

काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ

गिते यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासन, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त समन्वयातून

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन ट्रॅक्टर आणि

डंपरच्या सहाय्याने जलाशयांमधील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवत आहेत.

या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जमिनीची

सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. परिणामी, रासायनिक खतांवरील खर्च कमी होत असून शेतकऱ्यांच्या

उत्पादन खर्चात बचत होत आहे. त्याचबरोबर पीक उत्पादन आणि जमिनीची उत्पादकता वाढण्यासही

मदत मिळत आहे.

योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आला असून अनेक जलसाठ्यांची पाणी

साठवण क्षमता वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात अधिक पाणी साठवले जाणार असून

उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. गाळ काढल्यामुळे जलाशयांमध्ये पुन्हा

साठवण क्षमता निर्माण होत असून भूजल पातळी वाढीसही या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होत आहे.

या योजनेमुळे पर्यावरणीय दृष्टीनेही अनेक फायदे होत आहेत. जलाशय स्वच्छ राहिल्यामुळे पाण्याची

गुणवत्ता सुधारते, तसेच परिसरातील जैवविविधता आणि परिसंस्थेला पोषक वातावरण निर्माण होते.

काही ठिकाणी मत्स्य व्यवसायालाही या उपक्रमामुळे चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, या योजनेत लोकसहभागाला मोठे महत्त्व दिले जात आहे. ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि

शेतकरी गट यांच्या सक्रिय सहभागामुळे कामांना गती मिळत आहे. काही गावांमध्ये श्रमदानातूनही गाळ

उपसा करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक यंत्रसामग्री, नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन

उपलब्ध करून दिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande