माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम कौशल्यभिमुख रोजगाराची सुवर्णसंधी
परभणी, 01 जून (हिं.स.)। फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड तसेच रोपवाटिका व्यवसायामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कृषि तंत्र विद्यालय, परभणी येथे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील शेतकरी व भूम
माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम कौशल्यभिमुख रोजगाराची सुवर्णसंधी


परभणी, 01 जून (हिं.स.)।

फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड तसेच रोपवाटिका व्यवसायामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कृषि तंत्र विद्यालय, परभणी येथे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील शेतकरी व भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे.महाराष्ट्र शासनाने सन १९६५ मध्ये परभणी येथे माळी प्रशिक्षण योजनेस प्रारंभ केला. कृषि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ही योजना विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. सन १९७५ पासून कृषि तंत्र विद्यालय, परभणी येथे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असून सन २०१७-१८ पासून सुधारित अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.एक वर्ष कालावधीच्या या मराठी माध्यमातील पूर्णवेळ अभ्यासक्रमामध्ये फळे, भाजीपाला, फुले, हरितगृह, उतीसंवर्धन व हिरवळ व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमात ४० टक्के बौध्दिक आणि ६० टक्के प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. फळझाडांची अभिवृद्धी, कलमे व रोपे तयार करणे, रोपांचे संगोपन, बाग व्यवस्थापन तसेच आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःची फळबाग, रोपवाटिका, फुलशेती किंवा भाजीपाला प्रकल्प सुरू करण्याची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामपातळीवर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे, कृषि पूरक उद्योग उभारणे आणि विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये रोपवाटिका सहाय्यक अथवा माळी म्हणून रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.कृषि तंत्र विद्यालय, परभणी येथे अनुभवी शिक्षकवृंद, सुसज्ज व्याख्यानगृहे, सुशोभित परिसर आणि कृषि विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील विविध संशोधन प्रकल्पांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध आहे.अभ्यासक्रमासाठी उमेदवाराने इयत्ता ९ वी मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे व माजी सैनिकांसाठी ४५ वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.प्रवेशासाठी इयत्ता ९ वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ७/१२ उतारा अथवा भूमिहीन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश माहिती पुस्तिका व अर्ज कृषि तंत्र विद्यालय, परभणी येथे उपलब्ध असून प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जून २०२६ आहे. प्रवेश पुस्तिका किंमत अराखीव प्रवर्गासाठी ४०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी २०० रुपये आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande