सोलापुरातील कंत्राटदार सतीश भोसले यांचे गोव्यात दुर्दैवी निधन
सोलापूर, 0१ जून (हिं.स.) : सोलापूर शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार सतीश उद्धव भोसले (वय ५५, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे सोमवारी गोवा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. ही माहिती त्यांचे मावसभाऊ राहुल शिंदे यांनी दिली. सतीश भोसले हे सोला
fgdf


सोलापूर, 0१ जून (हिं.स.) : सोलापूर शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार सतीश उद्धव भोसले (वय ५५, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे सोमवारी गोवा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. ही माहिती त्यांचे मावसभाऊ राहुल शिंदे यांनी दिली.

सतीश भोसले हे सोलापूर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) विविध कामांशी संबंधित परिचित कंत्राटदार म्हणून ओळखले जात होते. गंगेवाडी परिसरात त्यांचा वाळू, मुरूम व इतर बांधकाम साहित्याचा मोठा व्यवसाय होता. शांत, मनमिळाऊ व प्रामाणिक स्वभावासोबतच धार्मिक वृत्तीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मित्रपरिवाराचाही मोठा गोतावळा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भोसले हे कुटुंबासमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेच्या तडाख्यात ते पाण्यात वाहून गेले. त्यानंतर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. सध्या त्यांचा मृतदेह गोवा येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला असून पार्थिव सोलापुरात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी सोलापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

सतीश भोसले यांच्या अकाली निधनामुळे महापालिका वर्तुळ, बांधकाम क्षेत्र तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. मदतीला तत्पर धावून जाणारा, जिवाभावाचा मित्र आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande