सहकार शेतकऱ्यांच्या हितासाठी असावा – आ. सतेज पाटील
गोकुळ संघातील राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप कोल्हापूर, १ जून (हिं.स.) : “तुम्ही गळ्यात गळे घालायचे होते तर गोकुळ संघ आणि गोकुळ बँकेची तीन महिने बदनामी का केली?” असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. पत्रकार परिष
गोकुळ संघ आणि  आ. सतेज पाटील


गोकुळ संघातील राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप

कोल्हापूर, १ जून (हिं.स.) : “तुम्ही गळ्यात गळे घालायचे होते तर गोकुळ संघ आणि गोकुळ बँकेची तीन महिने बदनामी का केली?” असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत त्यांनी गोकुळ दूध संघातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले की, महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फटका संघाला बसू नये. “दूध उत्पादक शेतकरी माझ्या बाजूने आहे, प्रत्यक्ष निवडणूक लागेल तेव्हा सत्य समोर येईल,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी आरोप केला की गोकुळच्या राजकारणावर राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा प्रभाव वाढला असून त्यामुळे स्थानिक नेत्यांचे स्वातंत्र्य कमी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या कमकुवत भूमिकेमुळे राज्यस्तरीय हस्तक्षेप वाढल्याचा दावा केला.

यापूर्वी काँग्रेसच्या काळात गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप झाला नाही, असे सांगत त्यांनी सहकार चळवळीतील पूर्वीची स्थितीही स्पष्ट केली. गोकुळमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेल्या पॅनेल राजकारणाचा उल्लेख करत त्यांनी सहकार क्षेत्र हे राजकारणापासून दूर असावे, अशी भूमिका मांडली.

तसेच प्रशासक नेमणुकीवरूनही त्यांनी टीका केली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी वारंवार विनंती करूनही प्रशासक नेमणूक का झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी टिप्पणी केली.

गोकुळ संघाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सहकार निवडणुका पक्षाच्या लेबलवर नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढवल्या पाहिजेत. “गोकुळ हा साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे,” असे सतेज पाटील यांनी सांगितले.

ठराव गोळा करण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी भाष्य करत संस्था चालकांना योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेले राजकीय वाद आणि गटबाजीमुळे सहकार क्षेत्रावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande