
परभणी, 01 जून (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या तसेच लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत योजनेची अचूक व सविस्तर माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी यांनी अभिनव पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेवरील ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाची योजना आहे. इयत्ता अकरावी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना निवास, भोजन, वैद्यकीय व इतर शैक्षणिक खर्चासाठी वार्षिक अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते.दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करतात. मात्र, पात्रतेच्या अटींची अपुरी माहिती, आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा नियमांची माहिती नसल्याने अनेक अर्ज अपात्र ठरतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाया जातात तसेच कार्यालयीन कामकाजावर अतिरिक्त ताण येतो.या समस्येवर उपाय म्हणून समाज कल्याण विभागाने स्वाधार योजनेशी संबंधित ऑनलाईन एमसीक्यू आधारित टेस्ट सिरीज विकसित केली आहे. मराठी माध्यमातील या परीक्षेत योजनेच्या पात्रता अटी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अनुदानाची रक्कम व इतर महत्त्वाच्या बाबींवरील ५० बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. ही परीक्षा पूर्णपणे मोफत असून स्मार्टफोन, संगणक किंवा टॅबलेटद्वारे कोणत्याही ठिकाणाहून सोडविता येणार आहे.टेस्ट पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांचे स्पष्टीकरण मिळणार असून यशस्वी सहभागीना ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योजनेची सखोल माहिती मिळून अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका कमी होतील तसेच पात्र विद्यार्थ्यांना लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल.स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या व घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी यांनी केले आहे. टेस्टसाठी http://exam.swadharpbn.in व अधिक माहितीसाठी http:// swadharpbn.in संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त आर. एच. एडके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis