जनगणनेत ‘मराठा’ शब्दाचा उल्लेख करण्याचे समाज संघटनांचे आवाहन
धुळे, 0१ जून (हिं.स.) : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना आणि मतदान पुनर्विलोकन (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध मराठा समाज संघटनांनी समाजबांधवांना जनगणनेत आपली माहिती अचूक नोंदविण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जात नोंदणी करताना मराठा, मराठा
जनगणनेत ‘मराठा’ शब्दाचा उल्लेख करण्याचे समाज संघटनांचे आवाहन


धुळे, 0१ जून (हिं.स.) : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना आणि मतदान पुनर्विलोकन (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध मराठा समाज संघटनांनी समाजबांधवांना जनगणनेत आपली माहिती अचूक नोंदविण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जात नोंदणी करताना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-पाटील, मराठा-देशमुख अशा स्वरूपात ‘मराठा’ हा शब्द नमूद करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन जनगणना तसेच मतदान पुनर्विलोकनाचे काम करत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येक मराठा कुटुंबाने सक्रिय सहभाग घ्यावा, कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती द्यावी आणि कोणतेही घर जनगणनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे समाज संघटनांनी म्हटले आहे.

घराची माहिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, पाण्याची व्यवस्था, वाहनांची माहिती यासह सर्व तपशील अचूकपणे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनगणनेचा पहिला टप्पा सुरू असून पुढील टप्प्यांमध्येही समाजाने सहभाग कायम ठेवावा, असेही नमूद करण्यात आले.

याशिवाय महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या मतदान पुनर्विलोकन अभियानांतर्गत मतदार यादीतील नावे तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाने २००२ आणि २०२४ च्या मतदार याद्यांतील नोंदी पडताळून बीएलओंना सहकार्य करावे, तसेच समाजातील कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले.

हे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा पंचमंडळ, मराठा महासंघ, राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती आणि कुणबी पाटील संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी सुधाकर दादा बेंद्रे, साहेबराव देसाई, रणजीत राजे भोसले, भानुदास बगदे, विनोद जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande